महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांच्या आश्वासनांची पेरणी


शिवसंवाद न्यूज भोर – : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असताना, भावी उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासनाचा खुराक देण्यास सुरुवात केली आहे. वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये, या निवडणुकीच्या निमित्ताने ‘आपला प्रतिनिधी आपल्या भागाचा कायापालट करेल’, अशी तीव्र विकासाची आस निर्माण झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांच्या अपेक्षांची यादी मोठी आहे. यात प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश आहे:

रस्ते आणि दळणवळण: खड्डेमुक्त रस्ते आणि गावे जोडणाऱ्या चांगल्या रस्त्यांची मागणी.

पिण्याचे पाणी: वर्षभर शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा.

आरोग्य सुविधा: प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे आणि आरोग्य सेवा सहज उपलब्ध करणे.

शिक्षण: जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणे, डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करणे.

रोजगार आणि उत्पन्न: स्थानिक पातळीवर रोजगार संधी वाढवणे आणि महिला बचत गटांना चालना देणे.

जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यपदाचे इच्छुक उमेदवार गावातील प्रमुख मंडळींच्या घरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. “मी निवडून आल्यास, आपले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार,” असे आश्वासन काही उमेदवारांनी दिले आहे, तर काहींनी “शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाचे मॉडेल” लागू करण्याचे तसेच तुमच्या मुलाला नोकरीला लावण्याचे काम माझं असे वचन दिले आहे. अनेक तरुण उमेदवार सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून व्हिडिओ ( रील ) माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

या संदर्भात एका स्थानिक नागरिकाने आपले मत व्यक्त केले,

 

 “प्रत्येक निवडणुकीत आश्वासने मिळतात, पण कामे अपूर्णच राहतात. आम्हाला आता फक्त पोकळ आश्वासने नको, तर प्रत्यक्ष काम करणारा आणि लोकांमध्ये मिसळणारा प्रतिनिधी हवा आहे. आमच्या समस्यांची जाणीव ठेवणारा नेताच खऱ्या अर्थाने विकास करू शकतो.”

निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसा हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. नागरिकांची विकासाची ही आस पूर्ण करण्यासाठी भावी सदस्य किती प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे काम करतील, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

म्हत्वाची बाब म्हणजे उमेदवारी कोणाला मिळणार या कडे जिल्हा परिषदेच्या चार गटातील मतदार लक्ष देऊन आहेत.गावच्या पारावर हॉटेल मध्ये संभाव्य उमेदवारांच्या पैजा लावल्या जात आहेत. आपल्याच पक्षाकडून स्वतःसाठी उमेदवारी खेचून आणणे हे इच्छुकांचे राजकीय भविष्य ठरणार आहेत.


शिवसंवाद

मुख्य संपादक : तुषार दत्तात्रय सणस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *