क्राईम

कापूरहोळ येथे भरदिवसा अपहरण; अवघ्या एका तासात पृथ्वीराज दळवीची सुखरूप सुटका


भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कापूरहोळ चौकात मंगळवार (दि. 03/03/2026) रोजी भरदिवसा घडलेल्या अपहरणाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ आणि प्रभावी वापरामुळे अवघ्या एका तासात अपहरण झालेल्या १८ वर्षीय पृथ्वीराज लखन दळवी याची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.

कापूरहोळ येथील उद्योजक लखन दळवी यांचा मुलगा पृथ्वीराज हा दुपारी सुमारे १.०७ वाजण्याच्या सुमारास पुणे–सातारा महामार्गवरील कापूरहोळ पुलाजवळून घरी जेवण्यासाठी जात असताना अज्ञात व्यक्तींनी काळ्या रंगाच्या XUV कारमधून त्याचे अपहरण केले. अपहरणकर्ते त्याला कापूरहोळ–सारोळा–वीर–मांडकी मार्गे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

घटनेनंतर वडील लखन दळवी यांनी आरडाओरड करत पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधत माहिती दिली. ही माहिती पुणे व सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना आणि गावांमध्ये तात्काळ प्रसारित करण्यात आली.

 

या घटनेनंतर राजगड पोलीस स्टेशन, खंडाळा पोलीस स्टेशन, जेजुरी पोलीस स्टेशन, सासवड पोलीस स्टेशन, शिरवळ पोलीस स्टेशन, लोणंद पोलीस स्टेशन, भुईंज पोलीस स्टेशन तसेच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांसह हायवे पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू केली. गावोगावी ग्रामस्थांनीही रस्ते अडवून संशयित वाहनांची तपासणी केली.

दरम्यान, जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी संशयित XUV पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच चालकाने वेग वाढवला. काही अंतर पाठलाग सुरू असतानाच अपहरणकर्त्यांनी पुरंदर तालुक्यातील मांडकी-जेऊर परिसरात पृथ्वीराज याला गाडीतून खाली सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी वळविताना ती रस्त्यालगतच्या चारीत अडकली. त्यामुळे आरोपींनी वाहन तेथेच सोडून जवळील ऊसाच्या शेतात पळ काढला.

अपहरण झालेला युवक सुखरूप आढळल्यानंतर कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, संतप्त जमावाने अपहरणासाठी वापरलेल्या वाहनाची तोडफोड केल्याची माहिती मिळाली. सुमारे दीड तास संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.

प्राथमिक तपासात पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करीत असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या घटनेमुळे ग्रामीण भागातही अपहरण, चोरी व लुटमारसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांपुढे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *