अखेर दहा वर्षांनंतर गोरक्षकांची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पत्रकार : तुषार सणस
भोर – २०१६ मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात गोरक्षक शिवशंकर स्वामी व त्यांच्या सहकाऱ्यांची अखेर भोर येथील न्यायालयाने संपूर्ण निर्दोष मुक्तता केली. जवळपास दहा वर्षे सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला.
गोरक्षणाच्या कार्यात कार्यरत असताना मारहाणीचा आरोप करत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित आरोप हे खोटे व सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा दावा गोरक्षकांकडून करण्यात आला होता. या प्रकरणामुळे संबंधितांना कारावासालाही सामोरे जावे लागले होते.
आज न्यायालयाने शिवशंकर स्वामी, प्रमोद जोरी, तेजस मनवे, सागर खिलारे आणि रमेश कोळी यांची निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर गोरक्षकांनी “सत्याचा विजय झाला असून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला,” अशी भावना व्यक्त केली.
या खटल्यात अॅड. विजय मुकादम, अॅड. प्रशांत यादव, अॅड. अजिंक्य मुकादम व अॅड. साहिल मुकादम यांनी बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांच्या निष्ठावंत वकिलीमुळेच न्याय मिळाल्याची कृतज्ञता शिवशंकर स्वामी यांनी व्यक्त केली.या निकालानंतर सर्व वकिलांचे गोरक्षकांनी गोमातेची मूर्ती देऊन आभार मानले या वेळी रामदास पाचकाळे, अमित गाडे, मयूर गाडे व सहकारी उपस्थित होते.

शिवसंवाद न्युज
