महाराष्ट्र एका निर्भीड आणि कार्यक्षम नेतृत्वाला पोरका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन
पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कर्तबगार नेतृत्व अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. ही बातमी खोटी ठरावी, दादा सुखरूप असावेत अशीच सर्वांची मनापासून इच्छा होती. मात्र नियतीपुढे कोणाचेही काही चालत नाही, आणि अखेर अजित पवार यांचे या अपघातात दुःखद निधन झाल्याचे अधिकृत वृत्त समोर आले.
या घटनेने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राजकारणातील धाडसी निर्णय, निर्भीड भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांच्या जाण्याने राज्याने एक सक्षम, अनुभवी आणि कणखर नेतृत्व गमावले आहे. “कामाचा वेग, निर्णयांची धार आणि विकासाचा अजेंडा” अशी त्यांची ओळख होती.
आज राज्याच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा सुरू होती — महाराष्ट्र एका निर्भीड आणि कार्यक्षम नेतृत्वाला पोरका झाला. दादांच्या कार्यकाळात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या विकासकामांवर याचा परिणाम होणार असून विकासाच्या गतीला खीळ बसेल, अशी भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन अजित पवार यांनी राज्याच्या हितासाठी घेतलेले कठोर निर्णय, शेतकरी, ग्रामीण भाग, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील कामकाजातील त्यांची पकड आज आठवली जात आहे. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला, राजकारणाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना महाराष्ट्र आज अश्रूंनी निरोप देत आहे.
दादा, तुमची उणीव कधीही भरून न निघणारी आहे…

शिवसंवाद न्युज
