ताज्या घडामोडी

भोर विधानसभा मतदारसंघ विकासाच्या शोधात; सोशल मीडियाच्या लाटेत अडकलेले वास्तव


भोर, पुणे | पत्रकार तुषार सणस : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भोर विधानसभा मतदारसंघाला आजही विकासाची स्पष्ट दिशा मिळालेली नसल्याचे चित्र समोर येत आहे. स्थानिक नेत्यांच्या वर्चस्वाच्या राजकारणात विकास मात्र गंभीर जखमी झाल्याची भावना मतदारसंघातील नागरिक व्यक्त करत आहेत. मूलभूत सुविधा अपुऱ्या राहिल्याने तालुका मागास होत चालल्याचे वास्तवही अधोरेखित होत आहे.

सध्या राजकीय वातावरणात सोशल मीडियाचा प्रभाव वाढला असून अनेक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते ‘ट्रेंडिंग’ राहण्यातच धन्यता मानत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. विविध गाणी, रील्स आणि प्रचारात्मक पोस्टद्वारे “बाप तो बाप रहेगा” अशा घोषणांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला जात असला, तरी प्रत्यक्षात विकासकामे मात्र अपेक्षित वेगाने होत नसल्याचे मत व्यक्त होत आहे.

भोर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांचा अभाव जाणवत आहे. सोशल मीडियावर कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा आणि डिझाइन्स फिरत असल्या, तरी प्रत्यक्षात अनेक कामे कागदावरच अडकलेली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

 

दरम्यान, या परिस्थितीसाठी प्रशासनालाही तितकेच जबाबदार धरले जात आहे. विकासकामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारांना कामे देण्यात येतात; मात्र त्यानंतर कामांच्या अंमलबजावणीवर अपेक्षित देखरेख होत नसल्याची तक्रार आहे. काही अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असून फोन केल्यावर “महत्त्वाची बैठक आहे” असे कारण देत जबाबदारी टाळली जात असल्याचेही नागरिक सांगतात.

 

कित्येक प्रश्न प्रलंबित असतानाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे विकास कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याचे आव्हान स्वीकारण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मतदारांचे मत आहे.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *