भोरच्या पूर्व भागात राष्ट्रवादीला मोठा धक्का; युवा पैलवान शुभम शेखर शेटे आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश!
भोर : भोर तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय गणिते बदलणारी मोठी घडामोड नुकतीच घडली आहे. भोंगवली गावचे सुपुत्र, युवा पैलवान आणि शेतकरी पुत्र शुभम शेखर शेटे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे व भाजप पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
शुभम शेटे आणि त्यांचे सहकारी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते.त्यांच्या या निर्णयामुळे पूर्व भागात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असून, हा राष्ट्रवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार संग्राम थोपटे यांनी शुभम शेटे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शुभम शेटे यांनी तरुण वयातच समाजसेवेचा वसा घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी रोहन बाठे यांनी शुभम शेटे यांच्या कामाचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, “शुभम शेटे यांनी आजपर्यंत अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत. पूर्व भागातील प्रत्येक गावामध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे असो किंवा सारोळा वीर आणि भोंगवली फाटा ते माहूर खिंड रस्त्याच्या मागणीसाठी केलेले यशस्वी आमरण उपोषण असो, त्यांनी सातत्याने जनतेचे प्रश्न मांडले आहेत.”भाजपमध्ये प्रवेश करताना शुभम शेटे यांच्यासह निखिल भांडे, सागर शिरगावकर, सुदर्शन भोसले, शैलेश गायकवाड, सूरज पवार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना शुभम शेटे म्हणाले, “यापूर्वी फक्त शब्दाचा मान राखून आम्ही राष्ट्रवादी पक्षात होतो. मात्र, सामाजिक काम करत असताना जो पाठिंबा आणि ताकद मिळायला पाहिजे होती, ती मिळाली नाही. आजपर्यंत मित्र परिवाराच्या मदतीने सामाजिक क्षेत्रात काम केले आणि सर्वांच्या विचाराने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचं ठरवलं आहे.”पूर्व भागातील विकास आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे मत शुभम शेटे यांनी व्यक्त केले.
या पक्ष प्रवेशावेळी भोंगवली गावचे भगवान भांडे, सामाजिक कार्यकर्ते चेतन धावले, गावच्या सरपंच अनुराधा शेडगे, माजी सरपंच अरुण पवार, संदीप निगडे ,प्रभाकर शेटे, वसंत परबळ, लक्ष्मण गायकवाड, दिलीप पवार, विठ्ठल गायकवाड आणि यांच्यासह ग्रामस्थ व भाजपा पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसंवाद न्युज
