भोर नगरपालिकेचा रणसंग्राम शिगेला; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण तापले!
शिवसंवाद प्रतिनिधी भोर :- भोर नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभांचे नियोजन केल्यामुळे भोरचे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठी प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात सरळ लढत होत आहे. एकूण ५३ उमेदवार रिंगणात असले तरी, मुख्य लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच दिसत आहे.
या प्रमुख लढतीसोबतच, इतर ठिकाणी सहा अपक्ष, दोन ठिकाणी शिवसेना आणि एक ठिकाणी काँग्रेस आपले नशीब आजमावत आहेत.निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण शिगेला पोहोचले असताना, दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांना मैदानात उतरवले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा रविवार, ३० नोव्हेंबर पोलिस स्टेशन समोरील राष्ट्रसंत गाडगे महाराज मैदान येथे होणार आहे.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सोमवार, १ डिसेंबर जिजामाता प्राथमिक विद्यालय मैदान येथे होणार आहे.या दोन बड्या नेत्यांच्या सभांमुळे भोर नगरपरिषद निवडणुकीतील रंगत आणखीच वाढली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने भोर शहरातील अनेक मूलभूत प्रश्न आणि विकासाचे मुद्दे चर्चेत आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी,सार्वजनिक शौचालय,स्ट्रीटलाईट,खेळाचे मैदान आणि सांस्कृतिक भवन,क्रीडा संकुल,आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेचा प्रश्न,बालोद्यान आणि वॉकिंग ट्रॅक,औद्योगिकरण आणि उत्रोली वडगाव औद्योगिक वसाहतीचा प्रश्न (सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या दृष्टीने महत्त्वाचा)
राज्यात महायुती सरकारमध्ये एकत्र काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.दोन्ही पक्षांकडून फडणवीस आणि पवार यांच्या सभांचे नियोजन केल्यामुळे, मतदारांचे लक्ष आता त्यांच्या भाषणांकडे लागले आहे. जाहीर सभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांवर टीका करणार का? एकमेकांच्या विरोधात बोलणार का? की, राज्यात एकत्र असल्यामुळे एकमेकांना ‘क्लिन चीट’ देणार? याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.या सभांमुळे शेवटच्या क्षणी निवडणुकीला कोणती कलाटणी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसंवाद न्युज
