भोर नगरपालिका निवडणूक: पाच वर्षांनी ‘दारात’ आलेल्या नेत्यांकडे ‘व्हिजन’चा पत्ता नाही; विकासाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा खटाटोप!
भोर | विशेष प्रतिनिधी (शिवसंवाद न्यूज)
भोर नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि शहरात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज भरल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा धुराळा आता शिगेला पोहोचला आहे. मात्र, या सर्व गदारोळात एक विदारक चित्र समोर येत आहे— पाच वर्षे मतदारांचा आणि विकासाचा पत्ता विसरलेले नेते आता पुन्हा “तुमच्यासाठी कायपण” म्हणत दारात उभे राहिले आहेत. दुर्दैवाने, शहराच्या भविष्याचे ‘व्हिजन’ मांडण्यापेक्षा एकमेकांचे वाभाडे काढण्यातच उमेदवारांची शक्ती खर्च होत असल्याचे दिसून येत आहे.
‘मीच भारी’ म्हणण्याच्या नादात संस्कृतीचा विसर सध्याच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक टीकेला उधाण आले आहे.उमेदवार आपल्या नेत्यांना घेऊन घरोघरी फिरत आहेत, पण त्यांच्याकडे शहराच्या समस्यांवर ठोस उपाययोजना नाहीत.प्रतिस्पर्धी उमेदवाराने केलेले घोटाळे आणि त्यांच्या चुकांचे पुरावे मतदारांना दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.सोशल मीडियावर भाषणे आणि ‘रील्स’चा पाऊस पडत आहे, ज्यामध्ये आपली राजकीय संस्कृती विसरून खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी केली जात आहे. केवळ प्रतिस्पर्ध्यापेक्षा “मीच भारी” हे सिद्ध करण्यासाठी हा अट्टाहास सुरू आहे.
मूलभूत सुविधांचा अभाव आणि मतदारांचा पेच भोर शहरात वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधांची वानवा असताना, या समस्यांवर नक्की काय पर्याय आहेत, यावर कोणीही बोलण्यास तयार नाही.
“निवडून आल्यानंतर शहराचा विकास कसा करणार? तुमचे व्हिजन काय?” या प्रश्नाकडे उमेदवार सोयीस्कर कानाडोळा करत आहेत.यामुळे भोरकर सध्या मोठ्या पेचात पडले आहेत. समस्या तशाच आहेत, पण आश्वासने मात्र जुनीच आहेत. त्यामुळे नक्की मत कोणाला द्यायचे, हा प्रश्न सुज्ञ नागरिकांना सतावत आहे.
भोरमधील पारावर आणि कट्ट्यांवर एकच चर्चा आहे— “अरे, विकासाची नक्की व्याख्या आहे तरी काय आणि ती मांडणार तरी कोण?” शहराचा विकास हा मुद्दा बाजूला राहून केवळ राजकीय गाठ बांधणे सुरू आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.
क्रमशः

शिवसंवाद न्युज
