राजकीय

भोर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा तिढा कायम: गणेश पवारांचे पारडे जड असल्याची चर्चा!


शिवसंवाद प्रतिनिधी भोर : भोर नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या भोर शहरात शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ विरुद्ध भाजपचे ‘कमळ’ अशीच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या निवडीसाठी मुलाखतींचे सत्र सुरू केले असून, पक्षाच्या कार्यालयांमध्ये इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे.

माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे, पूर्वीचा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत जवळजवळ हद्दपार झालेला दिसत आहे. थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचे अनेक विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामुळे सध्या भाजपचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे. याउलट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातही अनेकांच्या पक्षप्रवेशाने शहरात राष्ट्रवादीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

दोन्ही पक्ष कोणत्या प्रभागात कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यायचे यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्यानुसारच तिकीट वाटप करण्याची शक्यता आहे.

भोर शहरात नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे प्रमुख पक्षांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजपमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी गणेश पवार आणि संजय जगताप या दोन प्रमुख नावांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. आजी-माजी आमदारांशी संबंधित उमेदवारांमुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा हा पेच भाजपमध्ये कायम या चुरशीत भोर शहरातील तरुणाईच्या पसंतीमुळे गणेश पवारांचे पारडे जड असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. नगराध्यक्ष पदासाठी गणेश पवारांचे सामाजिक, राजकीय, सर्वच बाजूंनी पारडे जड असल्याची चर्चा भोर शहरात सुरू आहे

पवार घराणे पुर्वीपासून नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करत आहे.गणेश पवारांचे चुलते, स्वर्गिय शंकरतात्या पवार यांनी पंधरा वर्षे नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि गटनेते म्हणून काम पाहिले होते, त्यांचा मोठा जनसंपर्क होता.गणेश पवार यांनीही मागील पंचवार्षिकमध्ये नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि गटनेते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पवार यांनी आपल्या प्रभागात व शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत.त्यांनी रस्ते, वीज, पाणी आणि पाईपलाईन यांसारख्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत भरीव काम केले आहे.

याशिवाय, ते सातत्याने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंची आर्थिक मदत, गणेशोत्सव-नवरात्र मंडळांना भेटवस्तू, दिवाळी फराळ वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आरोग्य शिबिरे अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात.

गणेश पवार यांना शहरातून तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच, पवार घराण्याचे मोठे नातेसंबंध आणि जनसंपर्क असल्यामुळे मतदारांचा पाठिंबा वाढत असल्याचे बोलले जात आहे.

अपेक्षित लढत: पवार विरुद्ध आवारे ?

सध्याच्या राजकीय वातावरणात, शहरातून नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे गणेश पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रामचंद्र आवारे अशीच चुरशीची लढत होणार की काय, अशी चर्चा राजकीय अभ्यासकांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

एकंदरीत, भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार, हा तिढा कायम असला तरी, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी ही थेट लढत शहराच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *