राजकीय

भोंगवलीचा स्वाभिमान पेटला! गणेश निगडे अपक्ष उमेदवारीवर ठाम


सारोळा  : तीन हजारांहून अधिक मतदान असलेलं भोंगवली गाव आजवर राजकीय अन्यायाचं बळी ठरलं आहे. जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती, अनेक वर्षांपासून गावाला एकही उमेदवारी न देणाऱ्या नेत्यांविरोधात अखेर भोंगवली ग्रामस्थांचा  संताप उफाळून आला आहे.

या अन्यायाविरोधात गणेश निगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवत थेट राजकीय व्यवस्थेलाच आव्हान दिलं आहे. “गावाला केवळ मतांसाठी वापरलं गेलं, पण प्रतिनिधित्व मात्र नाकारलं गेलं. आता भोंगवली गाव वेठीस धरून चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा गणेश निगडे यांनी दिला.

भोंगवली गावातील सर्वसामान्य नागरिकांनी मला आदेश दिला असून गावचा स्वाभिमान जपण्यासाठी ही अपक्ष लढाई आहे. ही लढाई कोणत्याही पक्षासाठी नाही, तर भोंगवलीच्या हक्कासाठी आहे, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं.

या निर्णयाला गावातील तरुण, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून “संपूर्ण गाव माझ्या पाठीशी उभं आहे,” असा विश्वास गणेश निगडे यांनी व्यक्त केला. येणाऱ्या निवडणुकीत भोंगवली गाव आपली ताकद दाखवून देणार असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे.

राजकीय पक्षांनी दुर्लक्षित केलेल्या भोंगवलीने आता अपक्षाच्या माध्यमातून थेट रणशिंग फुंकल्याने या मतदारसंघातील राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *