राजकीय

भोर भाजपमध्ये बंडाचा वणवा! निष्ठावंतांची गळचेपी; ‘बाहेरच्यां’ना उमेदवारी दिल्याने जुन्या फळीचा संताप


भोर : गेली अनेक वर्षे प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन भोर तालुक्यात ‘कमळ’ फुलवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षाने आयुष्य वेचलेल्या जुन्या चेहऱ्यांना डावलून, नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे. “ज्यांनी वटवृक्ष लावला, त्यांच्याच बोकांडी फांद्या बसल्या,” अशा शब्दांत जुन्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

भोर तालुक्यातील भाजपच्या जुन्या फळीचा आरोप आहे की, ज्यांना उमेदवारी दिली गेली आहे, त्यांचे फक्त “फूल” भाजपात आले आहे, मात्र त्यांचे “देठ” अजूनही काँग्रेसच्या विचारधारेतच अडकलेले आहे. “कानामागून आले आणि तिखट झाले” या वृत्तीमुळे पक्षाने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. ज्यांनी अंगावर गुलाल घेतला आणि पक्षासाठी रक्ताचे पाणी केले, त्यांनाच आता घरचा रस्ता दाखवला जात असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

निष्ठावंत जीवन कोंडे यांना डावलल्याने ‘आरपार’ची लढाई

तालुक्यातील भाजपचा आक्रमक आणि निष्ठावंत चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवन कोंडे यांच्यासह अनेक इच्छुकांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला आहे. पक्षाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून आणि मतदारांच्या आग्रहाखातर जीवन कोंडे यांनी आता ‘अपक्ष’ निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सध्या पदावर असलेल्या कार्यकर्त्यांनाही जुन्या फळीने कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे. “ज्यांना वाटते की आपल्याला पद मिळाले आहे, त्यांनी जिल्हा परिषद निकालापर्यंत थांबावे. त्यानंतर तुम्हालाही दुधातील माशीप्रमाणे कचऱ्यात फेकून दिले जाईल,” असा खळबळजनक दावा संतप्त कार्यकर्त्यांनी केला आहे. पक्षात आता केवळ ‘चमचेगिरी’ करणाऱ्यांनाच स्थान मिळेल आणि जुन्या कार्यकारिणीला बाजूला सारले जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

संपूर्ण तालुक्यात किमान एक तरी जागा जुन्या कार्यकर्त्याला मिळायला हवी होती, अशी मागणी होत होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या या निर्णयामुळे भाजपला भोरमध्ये मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. आता जीवन कोंडे आणि इतर नाराज गट काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.तसेच जुने भाजपा कार्यकर्ते आपल्या उमेदवारांना डावलल्याने संपूर्ण तालुक्यात काय निर्णय घेणार हे देखील पाहणे महत्वाचे आहे.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *