युवासेनेचे जिल्हाप्रमुख आदित्य बोरगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश; ठाकरे गटाला मोठा धक्का!
भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या राजकारणात एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख आदित्य प्रकाश बोरगे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला असून, यामुळे आगामी काळात भोर आणि पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.
आदित्य बोरगे यांच्यासोबतच भोरमधील अनेक स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.ॲड. संभाजी यादव (सरपंच देगाव),विद्याताई यादव (माजी सरपंच देगाव),अजित बाबा चंदनशिव,तुळशीराम थिटे,अक्षय बोरगे,चेतन बोरगे,तानाजी खाटपे,उमेश गायकवाड,शांताराम शिंदे,दत्ताभाऊ बोरगे,कुंडलिक बोरगे,नागेश बोरगे यांनी प्रवेश केला.प्रवेशामुळे भाजपची स्थानिक ताकद आणि युती अधिक मजबूत झाली आहे.
आदित्य बोरगे हे युवासेनेचे जिल्हाप्रमुख असल्याने, त्यांचा भाजप प्रवेश हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठे आव्हान ठरणार असून यामुळे भाजपचे पारडे जड झाले आहे.
प्रवेशावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार संग्राम थोपटे, बाळासाहेब गरुड, शेखर वडणे, जीवन कोंडे यांसह भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आदित्य बोरगे म्हणाले,
“तालुक्याचा सर्वांगीण विकास, तरुणांना संधी आणि विश्वासार्ह नेतृत्व यासाठी आम्ही भाजपची वाट निवडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे.”
या पक्षप्रवेशाचे दूरगामी परिणाम आगामी निवडणुकांवर दिसण्याची शक्यता आहे. भाजपने या घडामोडींचा उत्साह व्यक्त करत आगामी भोर नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपला ठसा उमटवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
या प्रवेशामुळे भोर भागातील स्थानिक राजकारणात मोठे बदल घडून येण्याची शक्यता असून, भाजपचे भोर तालुक्यातील प्रभुत्व अधिक मजबूत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसंवाद न्युज
