राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार गट) स्नेहमेळाव्यात गणेश खुटवड यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी


नसरापूर : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचा स्नेहमेळावा नसरापूर येथील कुंभारकर लॉन्समध्ये संपन्न झाला. भोर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठी उपस्थिती दर्शवली.

या वेळी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत भोर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार गट आणि आठ गण लढवण्याची मागणी जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांच्याकडे केली.

मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी वेळू–नसरापूर जिल्हा परिषद गटातून गणेश खुटवड यांना उमेदवारी (तिकीट) देण्याची जोरदार मागणी केली. हा मेळावा भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि गणेश खुटवड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यकर्त्यांनी खुटवड यांच्या उमेदवारीसाठी भक्कम पाठिंबा दर्शवत म्हटले की, गणेश खुटवड यांनी कधीही शरद पवार साहेबांची विचारधारा सोडली नाही. त्यांची निष्ठा, सातत्य आणि लोकांमधील जनसंपर्क पाहून त्यांना संधी द्यावी. खुटवड हे या गटात खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी इच्छुक असून, पक्षाने विश्वास दाखवल्यास गटाचा सर्वांगीण विकास करून दाखवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

गणेश खुटवड यांचा सामाजिक आणि राजकीय कार्याचा अनुभव मोठा आहे. २०१० पासून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या माध्यमातून ते गड-किल्ले संवर्धन, रक्तदान शिबिरे आणि पुरग्रस्तांना मदत अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.२०२१ मध्ये ते उंबरे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आले.त्यांनी अवघ्या चार वर्षांत ४ कोटींहून अधिक विकासकामे पूर्ण केली आहेत.गेली नऊ वर्षे त्यांनी वेळू–नसरापूर गटातील गावोगावी जनसंपर्क दृढ ठेवला असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली

या स्नेह मेळाव्यात बोलताना गणेश खुटवड म्हणाले, “मी किती पाण्यात आहे हे पाहण्यासाठी मी आगोदर गावच्या सरपंच पदाची निवडणूक लढली आणि जिंकली. यामुळे संपूर्ण गाव माझ्याबरोबर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.” महाविकास आघाडीने एकजुटीने लढल्यास वेळू–नसरापूर गटातून विजय निश्चित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमातील उत्स्फूर्त वातावरण पाहता, पक्षाने तिकीट दिल्यास खुटवड यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा या वेळी सर्वत्र रंगली होती.

जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी या स्नेहमेळाव्यात इच्छुकांनी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी आपल्या गटातील पदाधिकारी, मित्रपरिवार आणि नातेवाईक यांची भेटीगाठी घेत तयारी सुरू करण्याचे सूचक विधान केले.गणेश खुटवड यांच्या उमेदवारी बद्दल पक्षश्रेष्ठींना कळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, त्यांनी वैभव धाडवे यांच्या गावभेट दौऱ्याचे कौतुकही या वेळी केले.

या मेळाव्याला विजयदादा कोलते (जिल्हाध्यक्ष), प्रमोद गोतारणे (युवक जिल्हाध्यक्ष), दुर्गा चोरघे (युवती जिल्हाध्यक्षा), रविंद्र बांदल (तालुकाध्यक्ष), मानसिंग धुमाळ (माजी उपसभापती), संदिप नांगरे (तालुका कार्याध्यक्ष), विठ्ठल शिंदे (भोर शहराध्यक्ष), गणेश बागल (जिल्हा सरचिटणीस), आरती धावले (युवती तालुकाध्यक्षा), वैभव धाडवे, रूक्मिणी पवार, आबासाहेब यादव, माऊली झेंडे, नितीन भगत, अमोल लिमण, समीर राऊत, प्रदीप मालुसरे, माऊली कोंडे, निलेश भोरडे, सुरेश झेंडे, सुधीर वाल्हेकर, संभाजी यादव, सुनिल डिंबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *