राजकीय

तरुण उद्योजक घडवून पूर्व भागाला वैभव मिळवण्याचा निर्धार! पत्रकार वैभव धाडवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्षात प्रवेश


शिवसंवाद प्रतिनिधी भोर : पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे आणि विशेषतः पूर्व भागातील तरुणांना उद्योगाकडे वळवणारे पत्रकार वैभव धाडवे यांनी आता सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये प्रवेश केला. ‘संधीचं सोनं’ करून तरुण उद्योजक तयार करून पूर्व भागाला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पत्रकारितेत कार्यरत असताना धाडवे यांनी ‘मी उद्योजक होणार’ ही हजारो पुस्तके तरुणांपर्यंत पोहोचवली, तसेच युवकांना मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन केले. यामुळे या भागातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी मोठी प्रेरणा मिळाली. शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी आणि कारखान्यांचे प्रश्न त्यांनी प्रभावीपणे उचलून धरले होते. त्यांच्या या सामाजिक तळमळीमुळे, परिसरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारीसाठी उभे करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

भोर तालुक्यातील परिस्थिती अजूनही बिकट असल्याचे त्यांनी नमूद केले. गटपातळीवर जिल्हा परिषद सदस्य शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आणि कृषी विकासाची कामे करू शकतात. मात्र, आजही अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो आहे.सर्वत्र रस्त्यांचे प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांना समाज उपयोगी शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट असून पायाभूत सुविधांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले

धाडवे यांच्या या प्रवेशामुळे आणि विकासाच्या निर्धाराने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत इतर उमेदवारांना मोठे आव्हान उभे राहणार आहे. वैभव धाडवे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला जिल्हाध्यक्ष विजय कोलते, भोर तालुकाध्यक्ष रविंद्र बांदल यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *