भोर कापूरहोळ मार्गावर अपघात: मद्यधुंद कारचालकाने माय-लेकांना चिरडले; तेलवडी गावावर शोककळा
भोर प्रतिनिधी : भोर-पुणे मार्गावर कासुर्डी गावाच्या हद्दीत कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला असून, कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदा लक्ष्मण धावले आणि त्यांचा मुलगा अमृत लक्ष्मण धावले (दोघेही रा. तेलवडी, ता. भोर) हे दोघे दुचाकीवरून आपल्या शेताकडे जात होते. कासुर्डी गावाच्या हद्दीत समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक हा पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. कारची तपासणी केली असता, गाडीमध्ये दारूच्या बाटल्या, पाण्याचे ग्लास आणि शेंगदाणे आढळून आले आहेत. यावरून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
स्थानिकांनी जखमी माय-लेकांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. एकाच कुटुंबातील दोघांचा अशा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तेलवडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’मुळे दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिवसंवाद न्युज
