कुस्तीच्या आखाड्यातून राजकारणाच्या मैदानात! पैलवान शुभम शेखर शेटे पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज; अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत.
शिवसंवाद प्रतिनिधी सारोळा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भोंगवली गावचे सुपुत्र आणि कुस्ती क्षेत्रातील यशस्वी पैलवान शुभम शेखर शेटे यांनी आता सक्रिय राजकारणात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ते आगामी पंचायत समिती निवडणूक भोंगवली गणातून लढवणार असून, सध्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
पैलवान शुभम शेटे यांनी कुस्ती क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे.ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल स्पर्धा: कांस्य पदक ,महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुवर्ण पदक,खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा: रौप्य पदक.कुस्ती क्षेत्रातील आवड जोपासतानाच, शुभम शेटे यांनी समाजकारणातही आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या ‘शिवशक्ती फाऊंडेशन’ संघटनेमार्फत त्यांनी पूर्व भागात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत कुस्ती क्षेत्रातील आवड आणि या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांनी भोर वेल्हा मुळशी पैलवान साम्राज्य केसरी पुणे जिल्हा कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. पूर्व भागातील प्रत्येक गावामध्ये त्यांनी बॉडी चेकअप शिबिर आणि डोळे तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केले.सारोळा वीर आणि भोंगवली फाटा माहूर खिंड रस्त्याच्या प्रश्नासाठी त्यांनी आमरण उपोषण करून ते यशस्वी आंदोलन केले होते.
पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभम शेटे यांनी पूर्व भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी काळात प्रत्येक गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा त्यांचा मानस आहे. भोंगवली गावच्या व पूर्व भागातील मतदार बंधूंच्या सहकार्याने निवडणूक लढवून विकासकामे करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
आतापर्यंत पै.शुभम शेखर शेटे यांनी कोणत्याच राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही, त्यामुळे ते निवडणूक अपक्ष लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ‘शिवशक्ती फाऊंडेशन’ मार्फत त्यांनी केलेल्या कामाची दखल अनेक पक्षांनी घेतली आहे.शुभम शेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अनेक पक्षांनी माझ्या कामाचा आढावा घेतला असून, त्यांनी बैठकीसाठी बोलावणे केले आहे.”याबाबतचा अंतिम निर्णय ते लवकरच घेणार आहेत. शिवशक्ती फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून पुढील दिशा निश्चित केली जाईल आणि पुढील आठवड्यात संघटनेची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे पैलवान शुभम शेटे कोणत्या पक्षाच्या चिन्हावर आणि कोणाच्या पाठिंब्यावर राजकारणाच्या आखाड्यात उतरणार, याकडे संपूर्ण पूर्व भागाचे लक्ष लागले आहे.

शिवसंवाद न्युज
