राजकीय

रोहिदास आबा कोंडे यांनी वेळू गण निवडणुकीसाठी थोपटले दंड !


शिवसंवाद प्रतिनिधी : किरण पांगारे

वेळू : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील वेळू गणातील राजकीय समीकरणे आता अधिकच तीव्र झाली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून निष्ठावान व जुने जाणते कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले रोहिदास आबा कोंडे यांनी मोठ्या तयारीने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिवगंगा खोऱ्यातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.

शिवगंगा खोरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची परंपरा जपणारं आणि तितकेच बुलंद शिवसैनिकत्वाची ओळख असलेले क्षेत्र आहे. याच भूमीतून घडलेले रोहिदास आबा कोंडे हे गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या विचारधारेवर खंबीर राहिले आहेत. विशेषतः पक्षात जेव्हा संकटाचे दिवस होते, तेव्हा ते विचलित न होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून ठाम राहिले. “शिवसेना ही आमची ओळख; कार्यकर्ताच आमचा खरा उमेदवार,” हा त्यांचा विचार स्थानिक कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहिला आहे.

 

कोंडे यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत वेळू परिसरातील स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. शिवसैनिकांवर अन्याय असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, किंवा युवकांसाठी संधीची गरज—तेव्हा ते रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे अग्रणी नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक न्यायासाठी उपोषणे, आंदोलने आणि संघटीत मोर्चे काढण्याची त्यांची परंपरा आजही कार्यकर्त्यांना स्फूर्ती देत आहे.

रोहिदास आबा कोंडे यांनी केवळ राजकारण न करता शिवभूमी संघटनेच्या माध्यमातून मोठे समाजोपयोगी काम उभे केले आहे. त्यांच्या या कार्याचा ठसा वेळू गणात ठळकपणे उमटला आहे. स्थानिक ग्रामस्थांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास असून, “आबा बोलतात कमी पण काम मात्र जास्त करतात,” अशी नागरिकांची सकारात्मक प्रतिक्रिया आहे.

याचमुळे गणातील निष्ठावान कार्यकर्त्यांची आता एकच ठाम मागणी आहे—”आयात उमेदवारांना नाही, तर निष्ठावान आणि स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी.”

रोहिदास आबा कोंडे यांची पक्षासाठीची अढळ भूमिका, संघर्षमय प्रवास आणि सामाजिक बांधिलकी पाहता वेळू गणात त्यांच्या उमेदवारीची चर्चा आता मोठ्या प्रमाणात उफाळून आली आहे. त्यांना पुढे आणल्यास शिवगंगा खोऱ्याच्या विकासाला नवा वेग मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *