“अजित पवारांचे एकनिष्ठ,विश्वासू सहकारी विक्रम खुटवड अध्यक्षपदाच्या चर्चेत!”
भोर, पुणे | पत्रकार : तुषार सणस
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा एकहाती सत्ता प्रस्थापित करत आपले वर्चस्व कायम राखले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने अध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून जिल्ह्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
अध्यक्षपदासाठी भोर तालुक्यातील भोंगवली–कामथडी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले विक्रम खुटवड यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विक्रम खुटवड हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.
यापूर्वी विक्रम खुटवड तसेच त्यांच्या पत्नी तृप्ती खुटवड यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून येत भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवली आहे. भोर हा भाजप नेते संग्राम थोपटे यांचा बालेकिल्ला मानला जात असताना, खुटवड दाम्पत्याने राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे बोलले जात आहे.
सध्याच्या निवडणुकीत विक्रम खुटवड जिल्हा परिषदेवर तर तृप्ती खुटवड भोर पंचायत समितीवर निवडून आल्याने स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खुटवड यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेता त्यांनाच पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी भोरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी विक्रम खुटवड यांच्या नावाची चर्चा जिल्हाभरात रंगू लागली असून आगामी काळात पक्षाकडून अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसंवाद न्युज
