लिंबू डाव,भोर तालुक्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा धक्कादायक प्रकार उघड
भोर: भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यात अघोरी जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विसगाव खोऱ्यातील जवळपास दहा गावांमधील नागरिकांच्या घरांसमोर अज्ञात व्यक्तीने लिंबू उतारा ठेवत जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एका छोट्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लिंबू, गुलाल, करडईच्या बिया आणि बिबवे यांची पुडी बांधून ती पुडी घरांच्या प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आली. सकाळी नागरिक उठल्यानंतर घरासमोर या संशयास्पद पिशव्या आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
खानापूर, बाजारवाडी, हातनोशी, बालवडी, नेरे, आंबाडे, कोळवडी यांसह आसपासच्या गावांमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असल्याने नागरिकांचे मन वळविण्यासाठी किंवा वशीकरणाच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला असावा, असा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या प्रकारामुळे काही गावांमध्ये नागरिक भयभीत झाले असताना, काही ठिकाणी मात्र तरुणांनी एकत्र येत कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता सर्व पिशव्या गोळा करून थेट कचऱ्यात टाकून दिल्या. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे लिंबू डाव, जादूटोण्याचे प्रकार तातडीने रोखण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

शिवसंवाद न्युज
