ताज्या घडामोडी

भोरमध्ये आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेची जय्यत तयारी ; प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांची विशेष बैठक


भोर प्रतिनिधी : आगामी २१ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यात रंगणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. या जागतिक दर्जाच्या स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भोरचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी प्रशासनातील सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन विविध सूचना दिल्या.

या स्पर्धेत जगभरातील ४० हून अधिक देशांतील नामांकित सायकलपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा मार्ग भोर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून जाणार असल्याने, खेळाडूंना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करून ते सज्ज करण्यात आले आहेत.

स्पर्धेदरम्यान सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक गावातील महसूल अधिकाऱ्यांनी राजकीय पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांची ५० जणांची यादी तयार करावी.या ५० जणांमध्ये दर १० व्यक्तींमागे एक ‘मॉॅनिटर’ (लीडर) नियुक्त केला जाईल.या स्वयंसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, टी-शर्ट आणि टोपी देऊन सन्मानित करण्यात येईल.

स्पर्धेच्या वेळेत मार्गावर कोणतेही पाळीव प्राणी किंवा नागरिक अचानक येऊन अपघात होऊ नये, याची सर्वस्वी जबाबदारी नियुक्त केलेल्या लीडरवर असणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याची प्रतिमा उंचावण्यासाठी गावागावांत स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“जगातील ४० देशांतील स्पर्धक आपल्या भागातून जाणार आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे गावातील महिला आणि नागरिकांनी एकत्र येऊन या आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचे स्वागत करावे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करावी,” असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी यावेळी केले.या बैठकीला भोर तालुक्यातील महसूल, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *