संगमनेरच्या सरपंच सायली साळुंखे यांना मोठा दिलासा ; विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ग्रामविकास मंत्र्यांकडून ‘स्थगिती’
शिवसंवाद प्रतिनिधी भोर : पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील संगमनेर ग्रामपंचायतीच्या सरपंच सायली महेंद्र साळुंखे यांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी त्यांना सरपंच पदावरून हटवण्याबाबत दिलेल्या आदेशाला राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी पुढील सुनावणीपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे.
पुणे विभागीय आयुक्तांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३९ (१) अन्वये कारवाई करत सायली साळुंखे यांना सरपंच पदावरून दूर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध साळुंखे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३९ (३) नुसार ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते.
या प्रकरणावर ६ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. यावेळी अपिलार्थी सायली साळुंखे आणि प्रतिवादी हनुमंत गायकवाड व इतर यांचे वकील तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली.दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, ग्रामविकास मंत्र्यांनी असे निरीक्षण नोंदवले की या प्रकरणात अपिलार्थी आणि प्रतिवादी यांनी मांडलेले मुद्दे अधिक सखोल तपासून पाहणे आवश्यक आहे.तपास पूर्ण होईपर्यंत सद्यस्थितीत कोणताही अंतिम निर्णय घेता येत नाही. वस्तुस्थिती विचारात घेता, ग्रामविकास मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांच्या ८ डिसेंबर २०२५ च्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे सायली महेंद्र साळुंखे यांना सरपंच म्हणून आपले कामकाज सुरू ठेवता येणार आहे.

शिवसंवाद न्युज
