ताज्या घडामोडी

यंदा परिवर्तनाची लाट राजकीय वारसा होणार भुईसपाट ! नव्या उमेदवारांना संधी मिळणार ? आणि तालुक्याला वैभव मिळणार !


भोर | प्रतिनिधी – शिवसंवाद न्यूज : भोर तालुक्यात येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भोर नगरपालिका निवडणूक अवघ्या फरकाने हातातून गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजू आता आगामी निवडणुकीत कोणतीही कसर सोडणार नसल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

तालुक्यातील अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षांतराच्या मनस्थितीत असून, उमेदवारी मिळेल की नाही या संभ्रमात इच्छुक नेते मित्र पक्षांसह विरोधी पक्षांमध्येही आपली चाचपणी करत आहेत. “आपला पक्ष उमेदवारी देणार का?” या एका प्रश्नाभोवती सध्या भोरचं संपूर्ण राजकारण फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या निवडणुका आता केवळ पक्षनिष्ठेपुरत्या मर्यादित न राहता, स्वाभिमान आणि व्यक्तिगत प्रतिष्ठेची लढाई बनल्या आहेत. परिणामी विकासाच्या ठोस मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी मतदारांना वेगवेगळ्या मार्गाने भुरळ घालण्याचे प्रयत्न काही नेते मंडळींकडून सुरू असल्याचं चित्र आहे.या व्यतिरिक्त व्यक्तिक स्वार्थापोटी पक्षांतर करून आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या उमेदवारांवरती मतदारांची कडवी नजर आहे.

दरम्यान, महिला मतदारांची भूमिका यावेळी निर्णायक ठरणार का? यावरही चर्चा रंगू लागली आहे. महिलांचे मतदान आपल्या बाजूने वळावे यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

कारण भोर तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवसंवाद न्यूजने घेतलेल्या प्रतिक्रिया पाहता, “गावाचा सर्वांगीण विकास करणारा, स्वच्छ प्रतिमा असलेला आणि नव्या दमाचा शिलेदार आम्ही निवडून देणार” अशी स्पष्ट भूमिका मतदार मांडताना दिसत आहेत.

येत्या काळात कोण बाजी मारणार, कोणता चेहरा जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.इच्छुक उमेदवारांच्या तसेच मतदारांच्या प्रतिक्रिया शिवसंवाद न्यूज पुढील बातम्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *