भोर तालुक्यात बदलाचे वारे! जुन्या पुढाऱ्यांना ‘घरचा आहेर’ देण्याच्या तयारीत मतदार; नव्या शिलेदारांना मिळणार संधी?
भोर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच भोर तालुक्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. वेळ कमी आणि प्रचार जास्त, अशा कात्रीत उमेदवार सापडले असले तरी, यंदा तालुक्यातील जनता मात्र वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. “भोर तालुक्याचा खरा विकास कोण करणार?” या पेचात अडकलेल्या मतदारांनी आता प्रस्थापितांना धक्का देण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विधानसभेनंतर आता स्थानिक सत्तेचे ‘धर्मसंकट’
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपला कौल दिला आहे. मात्र, “दिलेले ते मत योग्य होते का?” या मोठ्या धर्मसंकटात सध्या तालुक्यातील जनता आहे. याच पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर ‘सक्षम कारभारी’
शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याऐवजी, तो केवळ काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या पदरात पाडून घेतला जात असल्याची भावना जनतेमध्ये आहे. “शासकीय योजना लाटून मतदारांची गोड फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवायचा,” असे मत अनेक गावांतील नागरिक व्यक्त करत आहेत. यामुळे जुन्या आणि प्रस्थापित पुढाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
भोर तालुक्यातील विविध गणांमधून यंदा ‘नवे शिलेदार’ निवडून देण्यावर मतदारांचा कल दिसत आहे. नव्या दमाचे आणि विकासाची दृष्टी असलेले उमेदवार निवडून आल्यास, तालुक्याची प्रभावी वाटचाल होईल, अशी आशा मतदारांना आहे. “आम्हाला असा प्रतिनिधी हवा आहे जो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष विकासकामे खेचून आणेल,” अशा प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या आणि केवळ निवडणुकांपुरते दर्शन देणाऱ्या अनेक पुढाऱ्यांना यंदा मतदार ‘कायमचा घरचा आहेर’ देण्याच्या तयारीत आहेत. तरुण वर्ग आणि शेतकरी मतदारांची एकजूट पाहता, यावेळची निवडणूक प्रस्थापितांसाठी सोपी नसेल, हे स्पष्ट होत आहे.
“आम्ही केवळ घोषणांना भुलणार नाही, तर ज्याने विकास केला आणि जो आमच्या सुख-दुःखात धावून येईल, त्यालाच यंदा संधी देऊ. तालुक्याला आता बदलाची गरज आहे.” — एक जागरूक मतदार, भोर तालुका.

शिवसंवाद न्युज
