राजकीय

भोर तालुक्यात राजकीय भूकंपाची चाहूल… सात तारखेला जनतेचा कौल मतपेटीत होणार बंद !


पत्रकार : तुषार सणस 

भोर : भोर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. अवघ्या तीन दिवसांनंतर उमेदवारांचे राजकीय भविष्य मतपेटीत कैद होणार असून, अटीतटीच्या या लढतीत अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे अनेक नेत्यांनी गटबदल केल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय गणिते सोडवण्यासाठी सध्या बेरीज-वजाबाकी सुरू असून, यंदाच्या निवडणुकीत भोर तालुक्यात परिवर्तनाची नांदी होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मतांच्या रूपाने जोगवा मागताना शब्दांचे भान राखणे आवश्यक असते. मात्र खुर्ची धोक्यात येत असल्याची जाणीव होताच काही ठिकाणी सभांमधून धारदार भाषेचा अपशब्दांचा मारा केला जात असून, त्यातून तरुणांमध्ये क्षणिक उत्साह निर्माण होत असल्याचे दिसत आहे. आठ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीने मतदारांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे.

मतदार आता केवळ घोषणा नव्हे, तर आपल्या अडचणीच्या काळात सोबत उभे राहणारे, गावच्या विकासाला चालना देणारे तरुण व खमके नेतृत्व शोधत आहेत. मात्र त्याचबरोबर संयम आणि तारतम्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. निवडणुका येतात-जातात, पण शब्द कायम परिणाम करत राहतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा किंवा गटाचा असो, लोकनियुक्त पदाचा दावेदार असेल तर त्याने जबाबदारीने बोलणे गरजेचे आहे.

“जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे नेतृत्वाचे गुण निवडणुकीतच दिसतात,” असे मतदार व्यक्त होत आहे. मतदान करताना मतदार प्रामुख्याने चार मुद्द्यांचा विचार करतात

1. उमेदवार समाजकार्यात किती सक्रिय आहे,

2. गरज असताना हाकेला ओ देणारा आहे का,

3. शासकीय माहिती व प्रशासनावर वचक आहे का,

4. उमेदवार आणि त्याची स्वच्छ प्रतिमा.

या निवडणुकीत महिला, तरुण मतदारांसह ज्येष्ठ नागरिकही परिवर्तन आणि विकासाला प्राधान्य देताना दिसत आहेत. शिवसंवाद न्यूजने केलेल्या पडताळणीत असेही समोर आले की, सर्वसामान्य मतदार कोणत्याच मोठ्या नेत्याचे नाव न घेता, उमेदवार गावपुढाऱ्यांना हाताशी धरून कसे राजकारण करतोय, याकडे अधिक लक्ष देत आहे.

आता येत्या तीन दिवसांत मतदार नेमका कोणता निर्णय घेतो आणि निकाल काय लागतो, याकडे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

तुम्हाला काय वाटतं ? उमेदवार कसा असावा?

आपले मत व्हॉट्सअँप नंबरवर मेसेज करून पाठवा 7387874812

— शिवसंवाद न्यूज

https://www.instagram.com/shivsanwadlive?igsh=MWoyNHc0ZHFwYm40Nw==


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *